– संदेश पुजारी –
पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सर्वत्र राजकीय घडामोडींनी चांगलाच जोर धरलायं. त्यात सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघ म्हणून शिरूरकडे पाहिलं जात आहे. भोसरीचा आमदार ठरवणार शिरूरचा खासदार..! अशी पोस्ट सध्या सोशल मिडीयावर चांगला धुमाकूळ घालत आहे. त्याला कारणही तसचं आहे. भोसरी विधानसभेचे अपक्ष आमदार यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. म्हणूनच महेश लांडगे समर्थकांकडून ही पोस्ट व्हायरल केली जात आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग तीनवेळा विजयी होण्याचा ‘भीम पराक्रम’ केला आहे. मात्र यावेळेस आढळराव पाटलांची जादू कमी झाल्याचे चित्र आहे. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे विरूध्द खासदार आढळराव यांच्यातील संघर्ष गेल्या पाच साडेचार वर्षात पहावयास मिळाला. गेल्या दोन वर्षापूर्वी महेश लांडगे यांनी शिरूरच्या आखाड्यात उतरण्यासाठी ‘शड्डू’ ठोकले होते. मात्र या निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती झाली असून हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार आहे. त्यामुळे महेश लांडगे यांना युतीचा धर्म पाळावा लागणार आहे. दरम्यान खासदार आढळराव पाटील यांनी देखील स्पष्ट केले आहे की महेश लांडगे त्यांचाच प्रचार करतील. या निवडणुकीत आमदार लांडगे तटस्थ राहिले तरी कार्यकर्त्यांमध्ये वेगळा ‘संदेश’ जाऊन आढळराव यांच्या अडचणी वाढू शकतात असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीकडून विलास लांडे यांच्या नावाची चर्चा आहे. महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्यात कटूपणा अाहे. मात्र ‘नात्यागोत्या’मुळे या दोघांची ‘दिलजमाई’ झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यावर दोघांनीही काहीच स्पष्ट अशी प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामुळे लांडे समर्थकांना आशा आहे की आमदार लांडगे त्यांच्याच पाठीशी उभे राहतील. वास्तविक पाहता राष्ट्रवादीने अद्याप विलास लांडे यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही. विलास लांडे उमेदवार झाले नाही तर अमोल कोल्हे यांचे नाव चर्चेत आहे. कोल्हे जरी उमेदवार झाले तरी त्याचा फायदा महेश लांडगे यांनाच होणार आहे. अमोल कोल्हे विजयी झाले तर आढळरावांचा ‘काटा’ परस्पर निघणार आहे. तर विलास लांडे विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार होणार आहेत. लांडे यांचा एकदा पराभव केल्यामुळे पुढची विधानसभाही लांडगे यांच्यासाठी सोपी ठरणार आहे.
भोसरी मतदार संघात महेश लांडगे यांची प्रचंड ताकद आहे. त्यांचा ‘शब्द’ प्रमाण मानणाऱ्या समर्थक नगरसेवकांची फौजही मोठी आहे. तसेच आळंदी, खेड, चाकण परिसरात महेश लांडगे यांची ताकद वाढली आहे. या भागातील तरूण वर्गात त्यांची मोठी ‘क्रेझ’ पहायला मिळत आहे. थोडक्यात महेश लांडगे यांचे वजन ज्या कुणाच्या पारड्यात पडेल, त्यांचा विजय सुकर होणार अशीच राजकीय परिस्थीती बघायला मिळत आहे. म्हणूनच भोसरीचा आमदार ठरवणार शिरूरचा खासदार..! अशा आशयाचा पोस्ट महेश लांडगे समर्थकांकडून व्हायरल केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group