वडगाव मावळ (Pclive7.com):- ते माझं पहिलचं भाषण होते.. एक दोन चुका झाल्यात… काही लोकं जास्त बोलतात आणि काम कमी करतात.. पण माझी पध्दत वेगळी आहे. मी कमी बोलतो पण काम जास्त करणारा आहे असे उत्तर मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांनी दिले आहे. पार्थ पवार यांनी नुकतेच त्यांचे पहिले भाषण चिंचवड येथे केले होते. त्यावरून विरोधकांसह प्रसार माध्यमांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. त्याला आज पार्थ यांनी उत्तर दिले आहे.
वडगाव मावळ येथील भेडगे लॉन्स येथे पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना, मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि प्रचाराचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकारांनी त्या भाषणा विषयी विचारलेल्या प्रश्नाला पार्थ पवार यांनी उत्तर दिले.
चिंचवड येथील आहेर गार्डन येथे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी राजकीय कारकिर्दीतील पहिले भाषण केले. अगदी मोजक्या शब्दात मावळचा विकास करणार असल्याची ग्वाही दिली. परंतू विरोधक आणि प्रसार माध्यमांनी त्यांच्या कमी बोलण्याचा अन् भाषणाचा सडकून समाचार घेतला. सोशल मिडीयावरही पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडवण्यात आली.
त्याबाबत आज पत्रकारांनी पार्थ पवारांना विचारले असता, अतिक्षय नम्रपणे त्यांनी विरोधकांना चोख प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले की, ते माझं पहिलचं भाषण होते.. एक दोन चुका झाल्यात.. काही लोकं जास्त बोलतात, पण काम कमी करतात.. पण माझी पध्दत वेगळी आहे. मी कमी बोलतो पण काम जास्त करतो.. आणि तसे काम या मतदारसंघात करून दाखवेल.






















Join Our Whatsapp Group