पिंपरी (Pclive7.com):- नेपाळ येथे तपासासाठी गेलेल्या पुणे शहर गुन्हे शाखेच्या यूनिट ३ मधील फौजदार अजय राजाराम म्हेत्रे यांचे लखनऊजवळ हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरामधील नेपाळी नोकरानेच चोरी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास समर्थ पोलीस ठाण्याबरोबरच गुन्हे शाखेचे युनिट ३ करत होते. या दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की आरोपी हा नेपाळला पळून गेला आहे. यावरून युनिट तीनचे फौजदार अजय म्हेत्रे यांच्या अखत्यारीतील एक पथक नेपाळला रवाना झाले. हे पथक गेल्या पाच-सहा दिवसांपासून नेपाळमध्ये होते. त्यातील काही कर्मचारी नुकतेच माघारी आले होते. अजय म्हेत्रे व त्यांच्या बरोबर एक कर्मचारी मागे राहिले होते. त्यांची ट्रेन चुकल्याने ते बसने येत असताना त्यांना लखनऊजवळ हृदयविकाराचा त्रास झाला. यामध्ये त्यांचे निधन झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.






















Join Our Whatsapp Group