पनवेल (Pclive7.com):- प्रचारतोफा थंडावल्यानंतर आता २९ तारखेला होणाऱ्या मतदानाची प्रतीक्षा आहे. पण या दोन दिवसांच्या काळात पैसे वाटप होत असल्याचे नवी मुंबईतील कामोठ्यात समोर आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रति मतदार ४०० रुपये या प्रमाणे पैशांची वाटप केली जात होती. याप्रकरणी निवडणुक विभाग आणि पोलीस प्रशासन चौकशी करून पुढील कारवाई करत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण आणि पनवेल तालुकेही येतात. पनवेलमधील कामोठ्यात शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप केलं जात होतं. प्रति मतदार ४०० रुपये वाटप करताना शिवसेना कार्यकर्त्यांनी शेकाप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची मदार शेकापवर आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी मिळून इथे प्रचार करत आहे. याच दरम्यान पैसे वाटप होत असल्याचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिलंय. शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून २० हजार रुपये रोकड आणि मतदार यादी जप्त करण्यात आली.
मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून श्रीरंग बारणे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पार्थ पवार हे उमेदवार आहेत. पवार कुटुंबातील व्यक्तीसाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मावळमध्ये प्रचार केला. विशेष म्हणजे पार्थ यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मावळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून आहेत.