पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या मावळ लोकसभा मतदार संघातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. २ हजार ५०४ मतदान केंद्रावर तब्बल २२ लाख २७ हजार ७३३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज दुपारी सांगवीतील पीडब्लूडी मैदानातून या मतदान केंद्रांवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना करण्यात आलेत.
आपआपले साहित्य घेतले आहे की नाही, आपली मतदान मशीन योग्य आहे की नाही, का त्याच्यामध्ये काही बिघाड आहे का? ज्यांच्या मशीनमध्ये बिघाड आहे त्यांनी थांबा आणि बाकीच्या कर्मचार्यांनी आपापले साहित्य घेऊन बसमध्ये बसा, अशा सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देताच मतदान केंद्र गाठण्यासाठी साहित्य हाती घेऊन कर्मचार्यांनी उन्हाच्या कडाक्यातच आपापल्या मतदान केंद्रावर जाण्याची घाई केली होती.
उद्या दि.२९ सोमवारी मावळ लोकसभेची निवडणूक होणार असून या निवडणुकीचे साहित्य घेण्यासाठी कर्मचार्यांनी सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर मतदानाचे साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. या साहित्यांचे वाटप पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तात कर्मचार्यांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासूनच कर्मचार्यांना साहित्य देण्याचे काम चालू होते. प्रत्येक केंद्राचे नाव पुकारून त्या-त्या टेबलवर कर्मचार्यांच्या ताब्यात साहित्य देण्यात येत होते. या साहित्यांमध्ये प्रामुख्याने सीयुव, बीयुव व व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आले होते. एका मतदान केंद्रावर एक केंद्र अध्यक्ष, एक फर्स्ट पोलिंग ऑफिसर, २ पीओ, १ शिपाई व एक पोलिस असे मिळून मतदान केंद्राकडे रवाना झाले. हे साहित्य देताना बरेच कर्मचारी आपले साहित्य योग्य आहे का? मतदानाची मशीन खराब तर नाही, याची खात्री करीत होते. ठीक साडेबारा वाजता कर्मचार्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सूचना देताच कर्मचारी साहित्य घेऊन बसमध्ये बसले.
मावळची निवडणुक आकडेवारीतून..
एकूण मतदार : २२ लाख २७ हजार १३३, पुरुष मतदार : ११ लाख ६५ हजार ७८८, महिला मतदार : १० लाख ६१ हजार ३१३, इतर मतदार ३२, एकूण मतदान केंद्रे २५०४, एकूण कर्मचारी : १२ हजार ६५९, संवेदनशिल केंद्र ८३.