पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील राजवाडा हॉटेलचे मालक विजय ढुमे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे दोघे आरोपी गजाआड झाले आहेत. गुन्हे शाखा युनिट २ च्या टीमने ही कारवाई केली आहे. अक्षय लक्ष्मण शिंदे (वय २१ रा. वाघेश्वरनगर झोपडपट्टी, वाघोली) व देविदास उर्फ अमोल नागनाथ लष्करे (वय २३ रा. सिद्धार्थनगर, वाघोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अमोल गलफडे आणि विजय शिंदे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट २ चे पथक शहरात गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांना माहिती मिळाली की, रावेत येथील राजवाडा हॉटेलचे मालक विजय ढुमे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी किवळ येथील मुकाई चौकात थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी अक्षय आणि देविदास या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. याप्रकरणी त्यांच्यासोबत आणखी दोन आरोपी यात सामील असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
हा गुन्हा अजित साळवी आणि सचिन साठे नावाच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे. या बदल्यात आरोपींना चार लाख रुपये देण्यात आले होते. दोन्ही आरोपींना आता अटक केली असून त्यांच्याकडून दुचाकी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, मयुर वाडकर, प्रवीण दळे, किरण आरूटे, तुषार शेटे, हजरत पठाण, संजय गवारे, संदीप ठाकरे, जमीर तांबोळी यांच्या पथकाने केली आहे.





















Join Our Whatsapp Group