पिंपरी (Pclive7.com):- दोन दिवसापूर्वी कासारवाडी येथील इमारतीची सुरक्षा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका सहा वर्ष मुलाचा मृत्यू झाला होता. त्याठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलनिस्सारण नलिका टाकण्याचे काम सुरू होते. या घडलेल्या दुर्घटनेत संबंधित ठेकेदार तसेच महापालिका अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याप्रकरणी दत्ता साने यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलनिस्सारण विभागामार्फत कासारवाडी येथे पाईप लाईन टाकण्याचे काम चालू होते. याठिकाणी जेसीबी सहाय्याने खोदकाम सुरू असताना यशवंत प्राईड या इमारतीची सीमाभिंत अचानकपणे कोसळली. यात लोकेश ठाकूर या सहा वर्षीय मुलाच्या अंगावर सीमा भिंत कोसळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच दुर्घटनेमध्ये इतर दोन मजुरही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमध्ये महापालिकेचा ठेकेदार व अधिकारी दोषी असल्याचे दिसून येत आहे. हे काम करत असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेची साधने वापरण्यात अाली नाहीत. या भागात सुरक्षा बॅरिकेट्स लावण्यात आले नव्हते. त्यामुळेच ठेकेदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच या घटनेत चिमुरड्याचा मृत्यू झाला. तर दोन गरीब मजूर जखमी झाले. तरी या दुर्दैवी घटनेसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप मुलाच्या कुटुंबियास महापालिकेमार्फत योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group