पुणे (Pclive7.com):- ईव्हीएममध्ये फेरफार केल्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचा पराभव होऊ शकतो, ही शरद पवार यांनी व्यक्त केलेली भीती अनाठायी असून सुळे यांचा पराभव होईल असे वाटत नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी लक्षात घेता, मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, अशा शब्दात त्यांनी मोदी यांच्यावर टीका केली. तर एकंदरीत देशातील वातावरण पाहता निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार नाही असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच देवेगौडांसारखी एखादी व्यक्ती यावेळी पंतप्रधान होऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.
या निवडणुकीत राज्याबाबत काय निकाल लागतील हे सट्टा बाजारालाही आता सांगता येत नाही तर मी काय सांगणार, असे सांगून आंबेडकर यांनी, या निवडणुकीनंतर आम्ही मान्यताप्राप्त पार्टी होऊ इतक्या जागा यावेळी वंचित बहुजन आघाडीला मिळतील अशी खात्री बोलून दाखविली.
दुष्काळाबाबत बोलताना आंबेडकर यांनी, शरद पवार आणि सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. मागील ५० वर्षात या लोकांनी पाणी चोरून त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला आहे. तेच लोक आता दुष्काळावर बोलत आहेत. मी देखील दुष्काळासंदभात दौरे करत आहे. मात्र, मी त्याचे मार्केटिंग करीत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांचे दुष्काळी दौरे म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.























Join Our Whatsapp Group