पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव प्रभाग क्र.२१ मध्ये मोकाट जनावरे, भटकी कुत्री, डुकरे यांचा सुळसुळाट प्रचंड वाढला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पालिका या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करत नसल्याने नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरीगाव हा प्रभाग ‘प्राणी संग्रहालय’ म्हणून घोषित करण्याची उपरोधिक मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने “जीवनशैली निर्देशांक” उपक्रमासाठी देशातील ११६ शहरांची निवड केली होती. त्यात महाराष्ट्रातील प्रमुख १८ शहरांचा समावेश होता. एकूण ७९ निर्देशांकानुसार घेतल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये शहराची सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक, सुरक्षितता, अर्थव्यवस्था, रोजगार संधी, सार्वजनिक मैदाने, जमिनीचा वापर, कचरा व्यवस्थापन, अश्या १५ मुद्यांवर तपासणी करून नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशातून निवड झालेल्या शहरामधून पिंपरी चिंचवड शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पुणे शहराचा देशात पहिला क्रमांक आला. तर स्मार्ट सिटी दिशेने वाटचाल करीत असलेल्या पिंपरी चिंचवड नगरीचा देशात ६९ वा क्रमांक आला होता. हा पुरस्कार पिंपरी चिंचवड शहराला मिळवून दिल्याबद्दल आपले व आपल्या सर्व सहकार्यांचे विशेष आभार व कौतुक. आपण घेतलेल्या परिश्रमामुळे पिंपरी चिंचवड शहराचा ६९ वा क्रमांक आला. आपल्या जागेवर दुसरे आयुक्त असते तर शहर पहिल्या शंभर शहरांच्या यादीतून बाहेर पडले असते. हे असे पुरस्कार महापालिकेस वारंवार मिळत राहो म्हणून यासाठी पिंपरी प्रभाग क्रमांक २१ प्राणिसंग्रहालय म्हणून घोषित करण्यात यावा अशी उपरोधिक मागणी संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
वाघेरे यांनी पुढे म्हटले आहे की, आशिया खंडातील नावाजलेली महापालिका, उद्योगनगरी, संतांची भूमी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला देखील प्राण्यांचे शहर म्हणून देखील नवी ओळख प्राप्त होण्यासाठी आपले मोलाचे सहकार्य लाभेल. शहरामध्ये आपण काम केलेल्या कारकिर्दीत शहराला नव्याने ओळख प्राप्त करून दिल्याचे श्रेय देखील शहराच्या इतिहासामध्ये तुमच्याच नावावर लिहिले जाईल याची खात्री वाटत आहे. निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय हे असेही मगर चोरीला जाणे, अजगर चोरीला जाणे, या ना त्या कारणाने चर्चेत असते. परंतु प्रभाग क्रमांक २१ मधून आज पर्यंत एक सुद्धा जनावर किंवा कुत्रे चोरीला गेल्याची घटना आजपर्यंत घडलेली नाही. प्रभागामध्ये मोकार जनावरे, मोकाट कुत्री, डुकरे इतर पशु अगदी आनंदाने मुक्त वावर करीत आहेत. त्यांच्या पासून येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास देखील होत नाही. कारण नागरिकांना यासर्व गोष्टींची सवय होऊन गेली आहे. आयुक्त साहेब आपण नागपूर शहरातून पिंपरी चिंचवडमध्ये आलात. याचा अर्थ आपण बरेच काळ नागपूर शहरात वास्तव्यास होतात. आपली जर तेथील “सेंटर झु अॅथोरिटी” या विभागामध्ये ओळख असल्यास तेथे विनंती करून जर प्रभागामध्ये वाघ, सिंह, हत्ती,अस्वल, इतर प्राणी यांचा समावेश केलात तर खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक २१ हा प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्धीस येण्यास मदत होईल अशी खोचक टिपण्णी संदीप वाघेरे यांनी आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर केली आहे.






















Join Our Whatsapp Group