आळंदी (Pclive7.com):- येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज आळंदीचा पाहणी दौरा केला. सर्व प्रथम त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर नदी घाट परिसर तसेच आळंदीतील समस्यांची पाहणी केली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्वप्रथम प्रस्थानला पालखी थांबते तेथील रामघाटाच्या दुरावस्थेची पाहणी केली. घाटाच्या दुरुस्तीची गरज प्रकर्षाने त्यांच्या लक्षात आली. उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले व नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांना घाट दुरुस्तीचे अंदाजपत्रक प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या. वारीबाबत प्रशासकीय पातळीवर कुठलीही कामे अपूर्ण राहायला नको याबाबत मुख्याधिकारी समीर भूमकर यांना सूचना दिल्या.

त्यानंतर पाणीपुरवठा केंद्र तसेच धरण परिसरातील इंद्रायणी नदीच्या दुरावस्थेची पाहणी केली. आळंदी येथील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचा निर्णय घेतला. कचरा डेपो तसेच रिंगरोड आदी प्रश्न आळंदीकरांनी उपस्थित केले, त्याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आळंदीकरांना दिले.






















Join Our Whatsapp Group