पिंपरी (Pclive7.com):- पिंंपरी प्रभाग क्र.२१ मधील कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक संदिप वाघेरे यांनी ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या आवारामध्ये ट्रॅक्टर भरून कचरा टाकला.
या प्रश्नासंदर्भात संदिप वाघेरे म्हणाले की, क्षेत्रिय अधिकारी स्मिता झगडे यांच्याशी वारंवार चर्चा करण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडे इतरही विभागांचा पदभार असल्यामुळे त्यांना ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाचे कामकाज व्यवस्थित हाताळता येत नाही. क्षेत्रिय अधिकारी पदावर रुजु झाल्यापासुन त्यांना प्रभागामधील कोणत्याही समस्या सक्षमपणे हाताळता आलेल्या नाहीत. आरोग्य विभागाकडे जवळपास १२० कायम कर्मचारी, १५ घंटागाडी कर्मचारी, ठेकेदारी पद्धतीने असे मिळून जवळपास १५० कर्मचारी आहेत. तसेच प्रभागामध्ये कचरा गोळा करण्यासाठी दिवसा ७ गाड्या व २ ट्रक उपलब्ध आहेत. तसेच रात्रीची रस्ते सफाईसाठी जवळपास १० कर्मचारी ठेकेदारी पद्धतीने काम करत आहेत. सार्वजनिक तसेच मनपा इमारतीमधील शौचालय स्वच्छ्ता ठेवणेकामी व धुर फवारणी करणेकामी ठेकेदारी पद्धतीने गाड्या पुरविण्याचे टेंडर देण्यात आलेले आहे. परंतु एवढी मोठी यंत्रणा असतानाही कामकाज व्यवस्थित रित्या होत नाही, हा प्रश्न नागरिकांना पडत आहे. सातत्याने आरोग्य विषयक समस्याचा पाठपुरावा करुनही क्षेत्रिय अधिकार्यांना मनपा मुख्यालयातुन प्रभागातील समस्या पाहण्यासाठी वेळ मिळत नसल्याची खंत संदिप वाघेरे यांनी व्यक्त केली.
ठेकेदारी पद्धतीने सुरु असलेले काम हे फक्त ठेकेदार पोसण्यासाठी काढण्यात आलेले आहे काय अशी शंका येत असुन प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. तसेच दि.११/०६/२०१९ रोजी रात्रपाळीत काम करणार्या सफाई कर्मचार्यापैकी एकही कर्मचारी हजर नव्हता. हे सर्व कोणाच्या फायद्यासाठी सुरु आहे, हे समजने एक संशोधनाचा विषय बनला आहे. धुर फवारणीच्या गाड्या पंधरा पंधरा दिवस प्रभागामध्ये येत नाहीत. आल्यातर मशीन व्यवस्थितरित्या चालत नाहीत. किरकोळ स्वरुपाचा दंड आकारुन ठेकेदारांना बगल देण्यात येत आहे. पावसाळा सुरु होत असल्याने शहरामध्ये डेंग्यु सारखा आजार फैलावण्याची भिती बळावली आहे. त्यावर आरोग्य विभागामार्फत कोणत्याही उपाययोजना सुरु केल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे त्रस्त होऊन संदिप वाघेरे यांनी कचरा ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयामध्ये टाकण्याचा निर्णय घेतला तसेच या प्रकारानंतर प्रशासनाला जाग यईल अशी आशा व्यक्त केली आहे.






















Join Our Whatsapp Group