पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावर, प्रत्येक चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांचा शहरातील नागरिकांना तसेच वाहतुकीला अत्यंत त्रास होत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत शहरातील सर्व प्रभागातील प्रत्येक चौकातील टपऱ्या, अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश महापौर राहुल जाधव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी याबाबत आदेश दिलेत. चिंचवड स्टेशन येथील एका अनधिकृत टपरीधारकाने त्याच्या टपरीवर कारवाई करायला लावल्याच्या रागातून सत्ताधारी भाजप नगरसेवक शितल शिंदे यांच्याविरोधात पोलीसांत खोटी तक्रार दाखल केली. त्याचे पडसाद आज झालेल्या महापालिका सभेत उमटले. सर्व पक्षीय नगरसेवकांनी शितल शिंदे यांच्याविरोधात झालेल्या खोट्या तक्रारीचा निषेध केला. तसेच शहरात प्रत्येक चौकात होत असलेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा होतो. तसेच शहरातील अनधिकृत होर्डिंगमुळे नागरिकांना धोका निर्माण होत असल्याचे सांगत बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी झाली.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, आयुक्तांचे शहरावर लक्ष नाही. निवडणुका, परदेश दौरे यामुळे त्यांचे कामावर दुर्लंक्ष होत आहे. आयुक्तांनी त्यांची जबाबदारी ओळखून शहरात लक्ष द्यावे. तसेच नाशिक पालिकेने नाकारलेला शहर अभियंता आपण कशासाठी घेतोय. त्याऐंवजी स्थानिक अधिकाऱ्याला संधी द्यावी अशी मागणी कलाटे यांनी केली.
सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन महापौर राहुल जाधव यांनी शहरातील सर्व प्रभागातील रस्त्यांवरील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या बेकायदेशीर टपऱ्या तसेच अतिक्रमणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले.