पिंपरी (Pclive7.com):- पुणे महानगरपालिकेच्या धोरणानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने मॉल, मल्टिप्लेक्सला पार्किंग निःशुल्क करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शहराध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये मॉल, मल्टीप्लेक्समध्ये, हॉस्पिटल, इत्यादी ठिकाणी नागरिकांकडून पार्किंग शुल्क १० ते १०० रुपये पर्यंत वसूल केले जातात. अनेक संस्थानी यावर आवाज उठविला होता. मात्र त्यावर प्रशासनाने दुर्लक्ष केले. परंतु ही बाब आता न्यायालयात गेली असून न्यायालयाच्या आदेशानुसार आणि धोरणानुसार मॉल, मल्टिप्लेक्स या पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
पुणे शहर आणि परिसरात असलेल्या मॉल व मल्टिप्लेक्स मध्ये पार्किंग शुल्क आकारण्यात येणार नाही असा ठराव पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समिती मध्ये १४/६/२०१९ ला मंजुर करण्यात आला आहे. त्याच धोरणानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील परिसरातील मॉल, मल्टिप्लेक्स, इत्यादी पार्किंग निःशुल्क करावे, असे चिखले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून हा निर्णय पुणे महापालिकेच्या अनुषंगाने घ्यावा अशी मागणी मनसेने केली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष हेमंत डांगे, सचिव रुपेश पटेकर, महिला सचिव सीमाताई बेलापुरकर, उपाध्यक्ष चंद्रकांत दानवले, राजु सावळे, विभाग अध्यक्ष प्रतीक शिंदे, मयूर चिंचवडे, उपविभाग अध्यक्ष सुरेश सकट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group