पिंपरी (Pclive7.com):- जलसिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे तुरुंगात जातील, असे लोकसभा निवडणुकीपर्यंत सांगणाऱ्या भाजपने आता अचानक त्या मुद्यावरून ‘यु टर्न’ घेतला आहे. पवार हे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी, तरी तुरुंगात जातील का अशी विचारणा केली असता ते सांगायला मी ज्योतिषी आहे का ? अशी उलट विचारणा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये केली.
आगामी विधानसभेला अजित पवारांना पराभूत करणे हे आपले टार्गेट असल्याचे सांगून तशी व्युहरचना सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी लोकसभेला बारामतीत थोडे कमी पडल्याची कबुली चंद्रकांत पाटलांनी दिली. मात्र, २०२४ साठी, मात्र तेथे आतापासून कामाला लागलो असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातून बारामतीचा पुढील खासदार हा राष्ट्रवादीचा नसेल, असेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
लोकसभेनंतर आता विधानसभेची व्यूहरचना भाजपचे राज्यातील चाणक्य असलेल्या चंद्रकांत पाटलांनी आता सुरू केली आहे. बारामतीत अजूनही पवारांचे प्राबल्य असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे तेथील सहाही विधानसभा मतदारसंघाना बळ देणार आहे. त्यासाठी दर १५ दिवसांनी बारामतीला जाणार आहे. त्यातही काँग्रेसचे आमदार असलेले इंदापूर आणि भोर हे विधानसभा मतदारसंघ आता आपल्या निशाण्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणाऱ्या तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला पाटील सकाळी देहू येथे आले होते. त्यांनी तेथे पादुकापूजन केले. त्यानंतर पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते पिंपरी चिंचवडमध्ये आले. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.