देहू (Pclive7.com):- जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांच्या हस्ते श्री क्षेत्र देहूनगरीत करण्यात आले. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप मधूकर महाराज मोरे, सर्व विश्वस्त तसेच दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्यासह सांप्रदाय व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील व पार्थ पवार हे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. सकाळी चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवार यांच्या हस्ते पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर देहूतून मार्गस्थ झालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम गजर करीत दुपारी साडेबारा वाजता देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत दाखल झाला आहे.
तुकोबारायांचा पालखी सोहळा सायंकाळी ५ च्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती-शक्ती चौकात दाखल होणार असून पालखीच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, याचबरोबर विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांच्या वतीने पालखी स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.