पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांचे केलेले स्वागत त्यांच्या चांगलेच ‘अंगलट’ आले आहे. गेल्या दोन वर्षापासून सर्वच स्तरातून त्यांच्यावर टिकेची झोड उठत आहे. त्याचे पडसाद आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. आयुक्तांनी त्या प्रकरणावर खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे सदस्य मयुर कलाटे यांनी केली. मात्र त्यावर कोणतेच उत्तर किंवा खुलासा न देता आयुक्तांनी चिडीचुप राहणेच पसंद केले. आज झालेल्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडेगिरी हे होते.
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर भाजप पक्षामार्फत नुकताच सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व संकेत व शिष्टाचार बाजूला करत भाजप कार्यालयात जाऊन बंद दाराआड पालकमंत्र्यांशी ‘गुफ्तगू’ केले. आयुक्तांकडून शिष्टाचाराचा भंग झाला असल्याच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून सर्वच स्तरातून त्याचे पडसाद उमटत आहेत.
आजच्या स्थायी समितीच्या सभेत राष्ट्रवादीचे सदस्य मयुर कलाटे ‘त्या’ प्रकरणाबद्दल आयुक्त श्रावण हर्डीकर यांना खुलासा मागितला. परंतू त्यावर आयुक्तांनी कोणतेही उत्तर दिले नाही. उलट स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी यात हस्तक्षेप केला. विलास मडिगेरी म्हणाले की, तुम्ही काल आंदोलन केले आहे. आयुक्तांनी प्रसारमाध्यमांना त्याबाबत खुलासा केला अाहे. त्यामुळे तुम्ही आता कशाला विचारणा करत आहात असे बोलत एकप्रकारे आयुक्तांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.
अखेर मयुर कलाटे यांना कोणताच खुलासा मिळाला नाही. तेव्हा संतापलेल्या कलाटे यांनी आमच्याही राष्ट्रवादीच्या कार्यालयास भेट द्यावी असे निमंत्रणाचे पत्र आयुक्तांना दिले. दरम्यान, आयुक्तांनी भाजपच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीचे प्रकरण अजूनही काही दिवस गाजणार असेच चित्र आहे.






















Join Our Whatsapp Group