पिंपरी (Pclive7.com):- टोळी युद्धातून खून करून जेलमध्ये गेलेला आणि काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटलेल्या सराईत गुन्हेगाचा खून करण्यासाठी पिस्टल बाळगणाऱ्या भोसरीतील कुख्यात गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १ ने गजाआड केले आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.
गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (वय-३२ रा. नारायण रसाळवाडा, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने जेलमधून सुटलेला सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे याला मारण्यासाठी पिस्टल बाळगले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. युनिटचे पोलीस शिपाई गणेश सावंत यांना एक व्यक्ती दिघी रोडवरील सिद्धेश्वर शाळेसमोर उभा असून तो पिस्टल विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि बातमीदाराने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी पांडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडीत घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्टल आणि ४ जीवंत काडतुसे सापडली. त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पांडे टोळीचा म्होरक्या पांडे हा भोसरी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याची भोसरी परिसरात टोळी असून तो टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीचे आणि भोसरी भागात कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर लांडगे या दोन टोळ्यांमध्ये वारंवार वर्चस्व वादातून भांडणे होत असतात. याच वादातून २०१४ मध्ये आरोपी बाबा पांडे याने प्रतिक तापकीर आणि सँडी गुप्ता यांच्या मदतीने ज्ञानेश्वर लांडगे टोळीतील अक्षय काटेचा खून केला होता. आरोपी पांडे याच्यावर हाणामारी चोरी असे पाच गुन्हे भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सराईत ज्ञानेश्वर लांडगे फरार सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे हा किशोर झेंडे याच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये २०१५ पासून जेलमध्ये होता. तो जून महिन्यात जेलमधून सुटला आहे. ज्ञानेश्वर लांडगेचा खून करण्यासाठी किंवा स्वत:च्या संरक्षणासाठी पांडे याने पिस्टल बाळगले असल्याची शक्याता पोलिसांनी वर्तवली आहे. लांडगे हा जेलमधून सुटल्यापासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्त तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, गणेश सावंत, सचिन उगले, प्रविण पाटील, मनोजकुमार कमले, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.





















Join Our Whatsapp Group