पिंपरी (Pclive7.com):- पुणे महामेट्रोकडून पिंपरी चिंचवड शहरात मनमानी पद्धतीने कामकेले जात आहे. महापालिकेच्या नगरसेवकांनी माहिती मागितल्यास त्याला केराची टोपली दाखविली जाते. आवश्यक त्या परवानगी न घेता नियमभंग करीत काम चालू आहे. त्यामुळे सर्व परवानग्या घेतल्या जात नाहीत. तसेच नियमाचे पालन केले जात नाही. तोपर्यंत महामेट्रोच्या कामास स्थगिती देण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापौर राहुल जाधव यांच्याकडे केली आहे.
याबाबत दत्ता साने यांनी महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, शहरात मेट्रोचे काम सुरु झाल्यापासून काही ना काही वादात अडकले आहे. पुणे मेट्रोच्या कामात झाडांची कत्तल रोखण्याबाबत, बीआरटी मार्गातील मेट्रोचे पिलर तोडणे, दापोडी ते पिंपरी दरम्यानचे मेट्रोचे पिलर काढणे, पुणे मेट्रोबाबतचे नकाशे, आराखडे व अनुषंगिक माहिती मिळणे याबाबत तसेच मेट्रोच्या कासारवाडी येथील पिलरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आणल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र महामेट्रोला दिले. तथापि, अद्याप पर्यंत एकाही पत्राचे उत्तर मिळाले नाही. महामेट्रो स्थानिक स्वराज्य संस्थेतील विश्वस्तांनाच विचारत नाही. तर, सर्वसामान्य नागरिकांना कशी वागणूक देत असेल? याचबरोबर मेट्रोच्या सहयोगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन सुमारे सहा महिने थकविले होते. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविला. कासारवाडी येथे मेट्रोचे काम चालू असताना मेट्रोची क्रेन कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यातून मेट्रोचा हलगर्जीपणा समोर आला. कामासाठी रस्ते बंद केले जात आहेत. रस्ता बंद असल्याबाबतचे फलक लावले जात नाहीत. एकूणच महामेट्रोचा कारभार मनमानी पध्दतीने चाललेला आहे, असल्याचा आरोप साने यांनी निवेदनातून केला आहे.