– संदेश पुजारी –
पिंपरी (Pclive7.com):- एकेकाळी राष्ट्रवादीचा गड असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबिज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरूवात केली आहे. पिंपरीतून राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि युवा नेते शेखर ओव्हाळ यांच्यातच खऱ्या अर्थाने उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. रविवार पुण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्त्या विद्या चव्हाण, युवा नेते पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक युवा नेते शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्यासह नगरसेवक राजू बनसोडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, संदीपान झोंबाडे, सुनंदा काटे, काळूराम पवार यांनी मुलाखती दिल्या आहेत.
अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभेचे माजी आमदार आहेत. २००९ मध्ये पिंपरी विधानसभेची रचना झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून प्रथम आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. मात्र आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांना भरीव कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पोषक वातावरण असताना देखील बनसोडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्थानिकांसोबत जुळवून न घेणे तसेच अति आत्मविश्वासाचा फटका त्यांना बसल्याचे बोलले जाते. २०१४ च्या पराभवानंतर बनसोडे राजकारणात सक्रीय राहिले, परंतू ‘एकला चलो’चे धोरण ठेवत त्यांनी जनसंपर्क चालू ठेवला होता. मध्यंतरी ते राष्ट्रवादीतून बाहेर पडणार अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र त्यांनी रविवारी पक्षाकडेच उमेदवारी मागितल्यामुळे त्या केवळ अफवाच असल्याचे सिध्द झाले आहे. आता पिंपरीतून राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी ते प्रबळ दावेदार मानले जातात. त्यासाठी त्यांनी ‘फिल्डींग’ देखील लावली असल्याची चर्चा आहे.
पिंपरीतून सध्या शेखर ओव्हाळ यांच्या रूपाने नवा चेहरा राष्ट्रवादीला मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश करत सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. युवा वर्गात शेखर ओव्हाळ यांची चांगली ‘क्रेझ’ आहे. नुकतेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पिंपरीचे शिलेदार’ या कार्यक्रमाचे आयोजन करून आपले मनसुबे स्पष्ट केलेत. यावेळी पिंपरीतील जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला करून शहरातील राजकारणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक कर्तुत्ववान जेष्ठ मान्यवरांचा विशेष सन्मान करून त्यांनी जन माणसात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सर्वच बाबतीत ताकदीचा उमेदवार म्हणून शेखर ओव्हाळ यांच्याकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नाव देखील चर्चेत आहे. महापालिका सभागृहातील अभ्यासू नगरसेविका म्हणून त्या परिचीत आहेत. पक्षाकडून महिला चेहरा देण्याची वेळ आली, तर त्यांच्या नावाचा विचार नक्की होऊ शकतो. त्याअनुषंगाने सुलक्षणा शिलवंत-धर यांनी तयारी देखील सुरू केली आहे.
पिंपरी विधानसभेतून कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार हेच घेणार आहेत. त्यानुसार त्यांनी चाचपणी सुरू केलीयं. सध्या तरी अण्णा बनसोडे आणि शेखर ओव्हाळ यांच्यातच उमेदवारीसाठी खरी चुरस असल्याचे पहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार ? की ऐंनवेळी वेगळाच चेहरा पुढे आणणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे.





















Join Our Whatsapp Group