पिंपरी (Pclive7.com):- पाणी प्रश्नावरून सत्ताधारी भाजपातील नगरसेवकानेच उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे ऐंन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. वाकड – पिंपळे निलख प्रभागातील पाणीटंचाईच्या निषेधार्थ नगरसेवक तुषार कामठे यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दिड वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या पाणी टंचाईच्या समस्येला कंटाळून कामठे यांनी उपोषणाचे पाऊल उचलले आहे. सोमवारी (दि.२३) रोजी सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात प्रभागातील नागरिकांसह ते उपोषण करणार आहे.

याबाबत पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूजशी बोलताना नगरसेवक तुषार कामठे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेला कर स्वरूपात सर्वाधिक उत्पन्न देणारा प्रभाग म्हणून पिंपळे निलख-वाकडला ओळखलं जाते. मात्र तिथल्याच नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या दीड वर्षापासून दूषित पाणी आणि पाणीटंचाईच्या समस्येला येथील नागरिक सातत्याने सामोरे जात आहेत. स्थानिक नगरसेवक या नात्याने आपण या समस्येवर वारंवार आवाज उठवला आहे. दीड वर्षात तीन वेळा आंदोलने केली आहेत. विशेष म्हणजे येथील रहिवाश्यांनी स्वतःहून या आंदोलनात आपला सहभाग देखील नोंदविला होता. महापालिकेवर मोर्चा, आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मात्र या समस्येवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा असताना देखील या प्रभागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. वारंवार तक्रारी करून देखील सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी येथील रहिवाश्यांच्या सोबत महापालिका मुख्यालयात सकाळी १० बेमुदत उपोषणाला बसणार आहे. या उपोषणाला सर्वांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवावा असे आवाहन नगरसेवक तुषार कामठे यांनी केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकानेच उपोषणाचा निर्णय घेतल्यामुळे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे. अवघ्या ३० दिवसांवर निवडणुक असताना पाणी प्रश्न पेटल्यामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळणार आहे. आता आमदार जगताप यातून कसा मार्ग काढणार? तुषार कामठेंची मनधरणी कशी करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






















Join Our Whatsapp Group