पिंपरी (Pclive7.com):- महाकाली टोळीतील सराईत फरार गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून चार गावठी बनावटीचे पिस्टल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपीवर पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील आठ पोलीस ठाण्यांमध्ये १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सागर कुमार इंद्रा (वय २७, रा. देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक आतिक शेख यांना रविवारी (दि.२२) माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सागर हा घोटावडे गावाकडून बापूजी बुवा चौकातून हिंजवडीकडे येणार आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी दोन टीम तयार केल्या. एक टीम बापूजी बुवा चौकात तर दुसरी टीम गवारवाडी चौकात तैनात करण्यात आली. घोटावडे कडून येणाऱ्या वाहनांची कसून टेहाळणी पोलिसांनी सुरु केली.सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक दुचाकीस्वार संशयितरित्या आला. पोलिसांनी त्याला ओळखले आणि त्याचा मोटार सायकलवरून पाठलाग सुरु केला. संशयित आरोपी मेगा पोलीस चौकाजवळ एका पान टपरीवर सिगारेट पिण्यासाठी थांबला. त्यावेळी पोलिसांनी पान टपरीला वेढा देत सागर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. त्यानंतर त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या घरात आणखी दोन पिस्टल आणि दोन काडतुसे ठेवल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून एकूण चार पिस्टल, चार जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल, बॅग असा एकूण १ लाख ५० हजार ८५० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी सागर हा पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या महाकाली टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात पाच, देहूरोड पोलीस ठाण्यात तीन, पिंपरी पोलीस ठाण्यात दोन, वाकड, निगडी, चिंचवड, हडपसर, पुणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक असे एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. हडपसर पोलीस ठाण्यातील खुनाच्या आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील अपहरणाच्या गुन्ह्यात सागर फरार होता.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे, पोलीस कर्मचारी महेश वायबसे, किरण पवार, नितीन पराळे, हनुमंत कुंभार, आतिक शेख, विवेक गायकवाड, कुणाल शिंदे, सुभाष गुरव, चंद्रकांत गडदे, अमर राणे, झनक गुमलाडू, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे, रितेश कोळी यांच्या पथकाने केली.






















Join Our Whatsapp Group