पिंपरी (Pclive7.com):- विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात २१ ऑक्टोबरला विधासभेसाठी मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. निवडणूक लढण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह बहुतांश राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. त्यात तृतीयपंथीयही मागे नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून चक्क एक तृतीयपंथीय निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तशी त्याने घोषणाही केली आहे.
चिंचवड हा शिवसेना भाजपाचे वर्चस्व असलेला मतदार संघ आहे. या मतदारसंघातील अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे नताशा लोखंडे नामक तृतीयपंथीयाने सांगितले. आपल्याला उमेदवारी दिल्याचे जनहित लोकशाही पार्टीने जाहीर केले असल्याचे नताशाने सांगितले आहे.
जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने आज पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. विनोदराव मोरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष मिलिंद साळवी, महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब पाटोळे, जनहित कामगार महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज माने, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब तिरकुंडे, युवक आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आसिफ शेख, निकिता मुख्यदल आदी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी विधानसभेतून पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव रामचंद्र आल्हाट, भोसरीतून माजी नगरसेवक विश्वास गजरमल आणि मावळमधून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोषदादा चौधरी यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली.
चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप हॅटट्रिक करणार का?
चिंचवड मतदारसंघावर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. दोन वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आता तिसऱ्या वेळीही विजय मिळवणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेनेकडून राहुल कलाटे रिंगणात उतरतील. तेव्हा मात्र लक्ष्मण जगताप यांच्यापुढे आव्हान निर्माण होईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इथे लढायलाही अनेक जण उत्सुक आहेत.