पिंपरी (Pclive7.com):- शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवारी) बंदची हाक दिली होती. त्याला पिंपरी चिंचवडकरांनी समिश्र प्रतिसाद दिला. शहरातील अनेक भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील विविध भागात दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात होते. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने कारवाई केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे. या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शहर बंदची हाक दिली होती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यापारी, परिसरातील नागरिकांना बंदचे आवाहन केले जात आहे. नागरिकांकडून त्याला काही ठिकाणी प्रतिसाद मिळत असून बंद पाळला जात आहे.पिंपरी कॅम्प, निगडी, प्राधिकरण, पिंपळेसौदागर, सांगवी, डांगे चौक, थेरगाव, नेहरूनगर, भोसरी, संत तुकारामनगर आदी भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर काही भागातील दुकाने चालू होती. त्यामुळे बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान शहराच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात आला. पिंपरीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवणी, नगरसेविका निकिता कदम, संत तुकारामनगर, वल्लभनगरमध्ये माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा धर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख, डांगे चौकात युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपळे सौदागरमध्ये विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मोर्चा काढला होता.