मुंबई (Pclive7.com):- शिखर बँकेच्या कथित खोटाळ्यात संबंध नसताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यांना गोवले जात आहे. त्या बँकेत साहेब संचालक नव्हे तर सभासदही नाहीत. तरी देखील ईडीने साहेबांवर गुन्हा दाखल केला. त्यांना या वयात अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे व्यथित होऊन, प्रचंड अस्वस्थता वाढल्याने आपण तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठनेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र ननावरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, विवेक बुध्दीला स्मरून मी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे सर्वांना वेदना झाल्यात. मी का राजीनामा दिला, चुक होती का नव्हती, माहीत नाही. त्याच्या खोलात जाणार नाही. राजीनाम्याने सर्वच नेते व्यथित झालेत.भावना दुखवल्यामुळे सर्व नेते, कार्यकर्त्यांची माफी मागतो. आम्ही राज्य बँकेवर संचालक होतो. सर्व पक्षीय लोक तिथे होतो. कुणीही उठतो, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो. ठेवीच्या रकमेपेक्षा मोठा घोटाळा कसा होईल? त्याबँकेतील कोणतेही कर्ज थकलेलं नाही, सर्व कर्जे फिटलेत. अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना त्यावेळी मदत केली. वेळप्रसंगी नियमबाह्य मदत करावी लागते.
त्या बँकेशी शरद पवारांचा काडीमात्र संबंध नाही. तरी देखील पवार साहेबांचे नाव, माझे नाव भ्रष्टाचारात आले. साहेबांमुळे मी आज इथे पोहचलोय, त्यांचं नाव भ्रष्टाचारात आल्याने मी अस्वस्थ झालो. विचाराला पटत नव्हते, साहेबांची बदनामी होतेयं. म्हणून मी त्यांनाही न सांगता राजीनामा दिला. निवडणुकीच्या तोंडावर ही चौकशी कशी आली. २०१० च्या प्रकरणाचा २०१९ मध्ये गुन्हा दाखल झालायं.
मी अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिलायं. काल मी मुंबईतच होतो. बारामतीत पूर आला होता, मी तिकडे मदतीसाठी गेलो होतो. त्यानंतर मी मुंबईला आलो होतो. या पक्षानी मला मानसन्मान दिलायं, तिथे मी काही कारणास्तव उपस्थित राहिलो नव्हतो. आमचा परिवार मोठा आहे. पवार साहेबांचा प्रत्येक आदेश आम्ही पाळतो. आमच्या घरात कुठलाच गृहकलह नाही. मेडियातून काहीतरी चुकीचं पसरवलयं जातयं. पुढे शरद पवार म्हणतील त्याप्रमाणे भूमिका घेऊ असंही शेवटी अजित पवार यांनी स्पष्ट केलयं.





















Join Our Whatsapp Group