पिंपरी (Pclive7.com):- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज आज एबी फॉर्म जोडला नसल्याच्या कारणामुळे बाद ठरविण्यात आला. त्यानंतर तात्काळ शितोळे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला आहे. त्यामुळे नेमकं शहर राष्ट्रवादीत चाललयं तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र दुसरीकडे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात नवा ‘गेमप्लॅन’ तर नाही ना? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत शितोळे यांना उमेदवारी देण्यात आली. काल शितोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला. मात्र त्यासोबत पक्षाच्यावतीने एबी फॉर्म न जोडल्यामुळे आज त्यांची उमेदवारी बाद करण्यात आली. त्यानंतर प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षश्रेष्ठींबद्दल नाराजी व्यक्त केली. उमेदवारी दिली परंतू एबी फॉर्म न दिल्याने ते निवडणुकीच्या रिंगणातून ‘आऊट’ झाले आहेत. पक्षाकडून ही चुक झाल्याने प्रशांत शितोळे यांनी नाराज होत आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
त्याबाबत बोलताना प्रशांत शितोळे म्हणाले की, राष्ट्रवादीला संपूर्ण राज्यात सध्या पोषक वातावरण आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात परिवर्तन अटळ आहे. मी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पक्षाचे काम करत आहे. त्यामुळेच मला उमेदवारी देखील देण्यात आली. मात्र पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला नाही. अखेर एबी फॉर्म नसल्यामुळे माझा पक्षाचा अर्ज बाद करण्यात आला. एबी फॉर्म का मिळाला नाही याबाबत मी स्वतः संभ्रमात आहे. म्हणूनच पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. परंतू राजीनामा दिला असला तरी मी पक्षासोबतच राहणार आहे. यापुढे कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. तसेच या निवडणुकीत आपली भूमिका ‘तटस्थ’ असणार असल्याचे शितोळे यांनी शेवटी बोलताना सांगितले.





















Join Our Whatsapp Group