पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची दोन दिवसांपुर्वी भेट घेतली होती. चिंचवड विधानसभेतील अपक्ष उमेदवारांनी वंचित आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी मागणी उमेदवार राहुल कलाटे यांनी केली होती. त्यानूसार वंचित बहुजन आघाडी व भारिप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही म्हटले आहे. कालच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी कलाटे यांना राष्ट्रवादीता पाठींबा जाहीर केला आहे.
राहुल कलाटे पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदी आहेत. मागील वेळी म्हणजे २०१४ ला शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. त्यावेळेला राहुल कलाटे सेनेचे तर लक्ष्मण जगताप भाजपचे उमेदवार होते. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार असल्याने चिंचवडमध्ये चौरंगी लढत झाली होती. मोदी लाटेत कलाटे ह्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.