पिंपरी (Pclive7.com):- राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराला दोन राज्यमंत्री दर्जाची पदे तसेच एक महामंडळ अध्यक्षपद मिळाले होते. आता राज्यातील सत्ता गेल्यामुळे शहरातील या पदाधिकाऱ्यांची ही पदे जाणार अाहे. त्यात प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेल्या सदाशिव खाडे यांनाही राजीनामा द्यावा लागणार आहे. तसेच राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सचिन पटवर्धन यांना सोडावे लागणार आहे. तर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद भाजपाच्या अमित गोरखे यांना गमवावे लागणार आहे.
२०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपा सत्तेवर आल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना पदे देऊन ताकद देण्याचा प्रयत्न पक्षाने केला होता. यामध्ये सर्वांत पहिल्यांदा राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सचिन पटवर्धन यांना मिळाले होते. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले हे पद पहिल्यांदाच शहराला मिळाले होते. यानंतर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात आघाडी सरकार असताना अजित पवार यांनी या पदावर लोकप्रतिनिधीची नियुक्ती केली नव्हती. भाजपाचे सरकार येताच या पक्षाच्या निष्ठावंत आणि मुंडे गटाचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाडे यांना संधी देण्यात आली होती.
यानंतर बिगबजेट असलेले व राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपदही शहरातीलच भाजपाचे कार्यकर्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अमित गोरखे यांना देण्यात आले होते. महापालिके व्यतिरिक्ततीन महामंडळाचा कारभार हा शहरातील नेत्यांच्या हाती होता. त्यामुळे भाजपाची ताकद खऱ्या अर्थाने शहरात वाढविण्यास मदत झाली होती. तर कार्यकर्त्यांनाही ताकद मिळाली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपाचेच सरकार येणार असा ठाम विश्वासात असलेल्या या पदाधिकाऱ्यांना आपले कायम राहणार हा विश्वास होता. मात्र, राज्य पातळीवर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. राज्यातील सत्ता गेल्यामुळे या तीनही मंडळावरील अध्यक्षांना आपली पदे सोडावी लागणार हे स्पष्ट झाले.






















Join Our Whatsapp Group