पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. तरी देखील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरवासियांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच शहर काँग्रेसच्यावतीने प्रशासनाच्या निषेधार्थ महापालिकेवर आज धडक मोर्चा काढण्यात आला. नही चलेंगी, नही चलेंगी, तानाशाही नही चलेंगी, दिवसाआड पाणी कपात रद्द करा, टँकर लाॅबी बंद करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरवासियांवर अन्यायकारक दिवसाआड पाणी कपात लादली आहे. पवना धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. पुढच्या वर्षीच्या आक्टोबर पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तरीही सत्ताधारी भाजप आणि पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणा व नियोजन शून्य कारभारामुळे शहरवासियांवर पाणी कपात लादण्यात आलेली आहे. ही दिवसाआड पाणी कपात तातडीने रद्द करा, पाणी पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले.