पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडनगरीमध्ये मराठवाड्यातील बांधवांसाठी ‘मराठवाडा भवन’ व गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे स्मारक उभे करण्याचे मराठवाडा जनविकास संघाने ठरविले आहे. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुढील जयंती पर्यंत मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने यांचे भूमिपूजन होईल असा विश्वास मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी व्यक्त केला.
मराठवाडा जनविकास संघ व जय भगवान महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंती मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडा जनविकास संघ व जय भगवान महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने “विकास आश्रम” सोनवणे वस्ती, चिखली येथील विद्यार्थांना फळे व धान्य वाटप करण्यात आले व मौजे बिजनवाडी येथील भजनी मंडळींना २५ टाळ व एक मृदंगाचे वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ह.भ.प. तांदळे महाराज म्हणाले की, गोपीनाथजी मुंडे साहेब हे जनसामान्यांचे नेते होते. त्यांचे कार्य आपणास निश्चितच प्रेरणादायी व बोधप्रद असेच होते. मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून होत असलेली कामे उल्लेखनीय आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड नगरीमध्ये मराठवाड्यातील बांधवांसाठी मराठवाडा भवन व गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे स्मारक उभे करण्याचे मराठवाडा जनविकास संघाने ठरविले आहे. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुढील जयंती पर्यंत मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने भूमिपूजन होईल.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले की, लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे कार्य फार महान आहे. आपल्या मराठवाडा भागातील सुमारे ४ लाख बांधव उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपली मातृभूमी सोडून स्थायिक झालेले आहेत. आपल्या बांधवांच्या मुला मुलींची शिक्षणासाठी पिंपरी चिंचवड शहरात आल्यावर हाल होवू नयेत यामुळे आपण “मराठवाडा भवनाचे” उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या करीता मराठवाडा जनविकास संघाने जनगणना सुरु केली होती. त्या जनगणनेमध्ये एक लाखाच्या पुढे नोंदणी पूर्ण झालेली आहे. या सर्व बांधवांच्या सहकार्याने मराठवाड्यातील बांधवांसाठी मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून मराठवाडा भवन व लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब स्मारक यांचे भूमिपूजन हे पुढील वर्षीच्या जयंती पर्यंत होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.प्रा. संपत गर्जे होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राजपूत महासंघाचे दिनेशसिंह राजपूत लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा जीवन प्रवास आपल्या भाषणातून उलगडून दाखवला. जोशी मॅडम यांनी मुंडे साहेबांच्या जीवनावरील कविता वाचून दाखवली. त्याचबरोबर जय भगवान महासंघाचे हनुमंतराव घुगे, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ सदस्य, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक सदस्य, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक सदस्य हे बहुसंख्येने उपस्थित होते. श्रीकांत चौगुले आदी मान्यवरांनी आपल्या भाषणातून मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. जय भगवान महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश ढाकणे, जय भगवान महासंघाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अमोल नागरगोजे, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, श्रीकांत चौगुले, प्रकाश बंडेवार, कृष्णाजी खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती बाणेवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन मराठवाडा जनविकास संघाचे सहसचिव वामन भरगंडे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group