पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव, पडवळनगर प्रभाग क्र. २३ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अदनाज हमीद मणियार (वय ९ महिने) व उजेर हमीद मणियार (वय ४ वर्ष) या दोन सख्या भावांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला. याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
याप्रकरणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आज निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, उपाध्यक्ष प्रशांत दिलिप सपकाळ, विशाल तुकाराम पवार, अविनाश गायकवाड व मृत्यूमुखी पडलेल्या बालकांचे वडील हमीद मणियार, नातेवाईक तोफीक पठाण उपस्थित होते.
थेरगाव मधील प्रभाग क्र. २३ मधील वहिनीसाहेब कॉलनी, दगडू पाटीलनगर, जगतापनगर या परीसरामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य, सांडपाणी व मलनिस्सारण पाणीपुरवठा विभागाच्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. परंतु वारंवार तक्रारी करुनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विभागातील नागरीकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या संपूर्ण प्रभागात गेल्या २ वर्षापासून खोदलेले रस्ते त्यामुळे जागोजागी झालेली पाण्याची डबकी साचलेली आहेत. तसेच नविन पाण्याची व ड्रेनेजची लाईन टाकताना जुने कनेक्शन तसेच ठेवल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचलेली आहेत. नवीन पाण्याची व ड्रेनजची लाईन टाकताना जुने कनेक्शन तसेच ठेवल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचून त्या पाण्यामध्ये डासांची निर्मिती झालेली आहे. याबाबत नागरीकांच्या तक्रारीनतंर सुध्दा महापालिकेच्यावतीने औषध फवारणी, धुरीकरण, साफसफाई, ड्रेनेज स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट करण्यात आलेली नाही. तसेच मोकळ्या जागेमध्ये भंगारचे गोडाऊन आहेत. तेथे टायर, बाटल्या उघड्यावर पडलेल्या असून त्यामध्ये सुध्दा पाण्याची डबके साचून डासांची निर्मिती झालेली आहे. या सर्वांचा परीणाम म्हणून गेल्या महिनाभरात दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यामध्ये या कुटूंबियांची काही चूक नाही त्यामुळे मनपा प्रशासनच या घटनेस जबाबदार आहे. त्यामुळे मनपाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन या कुटूंबियांस मनपामार्फत आर्थिक मदत करण्यात यावी. तर या प्रभागातील अधर्वट राहिलेली कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group