पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शास्तीकर बाधितांची माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी रविवारी (दि.२२) रोजी दुपारी ४ वाजता आकुर्डीतील खंडोबा माळ मंदिरा शेजारील मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली आली आहे.
दत्ता साने यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हजारो अनधिकृत बांधकामे आहेत. या अनधिकृत व वाढीव बांधकामांना महानगरपालिकेने मिळकतकरामध्ये बेकायदेशीरपणे शास्तीकर आकारला आहे. याबाबत आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी व नागरिकांनी आंदोलने व निदर्शने केली आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात देखील शास्तीकर माफीबाबत निर्णय घेऊ असे, आश्वासन देण्यात आले होते. मात्र, युती सरकारच्या कार्यकालात इच्छाशक्ती अभावी शास्तीकर माफीचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही. शास्तीकराबाबत निव्वळ राजकारणच केले जाते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व शहरातील आमदारांनी शास्तीकर माफ केला अशी नागरिकांची दिशाभूल करून अनेकदा साखर, पेढे वाटून स्वत:ची जाहिरात करून प्रसिद्धी मिळवली. मात्र, शहरातील गोर, गरीब कष्टकरी कामगार मिळकतधारक शास्तीकर माफीच्या लाभापासून वंचित राहिला. या सर्व बाधितांना आता न्यायालयातूनच न्याय देऊ असा निर्धार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी केला आहे.
यानिमित्त शहरातील सर्व शास्तीकर बाधितांची बैठक रविवारी (दि.२२) दुपारी ४ वाजता आकुर्डीतील खंडोबा माळ मंदिरा शेजारील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शास्तीकर बाधित नागरिकांनी मिळकतकर पावती, किंवा मिळकतकर भरण्याबाबतची नोटीस प्रत्येकी दोन प्रती घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन दत्ता साने यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group