पिंपरी (Pclive7.com):- राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या सरकारचा आज झालेल्या महापालिका सभेत अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे या होत्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची दि.२० डिसेंबर रोजी तहकूब झालेली सभा आज पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांनी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. ते म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारने शहरातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेही असतील. मात्र आज शहरवासियांची जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते हे नवे सरकार नक्कीच सोडवेल.
सत्तारूढ पक्ष नेते एकनाथ पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाने विचारसरणी सोडून सत्तेत आलेल्या हे सरकार आहे. आमचा या अभिनंदनाच्या ठरावाला नक्कीच पाठिंबा आहे. परंतु काही कटू गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत आमचं आधीच ठरलं होतं. मात्र थोडी गडबड झाली आणि आमचं सरकार होऊ शकलं नाही. आता तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारने गोरगरीब कामगार तसेच पिंपरी चिंचवड शहरवासीयांना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे. त्यानंतर महापौर माई ढोरे यांनी या नवीन सरकारच्या स्थापनेबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.






















Join Our Whatsapp Group