पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मार्फत खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करताना संबंधित जमीन मालकास मोबदला करण्याचा विषय महापौरांनी कोणतीही चर्चा न करतात तहकूब करत दप्तरी दाखल केला त्यावरून आजच्या महापालिकेच्या सभेत चांगलाच गोंधळ झाला. कोणतेही कारण न देता महापौरांनी विषय तहकूब केला. त्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी थेट मानदंड उचलला. त्यानंतर कोणती सूचना तसेच अनुमोदन न देता महापौर सभागृहातून बाहेर पडल्या. महापौरांनी सभा तहकुबीची तारीख सांगितली नसल्याने नगरसचिवांनी सभा तहकुबीची तारीख कळविली जाईल असे नगरसेवकांना सांगितले. परंतु, काही नगरसेवक सभागृहात बसून राहिल्यानंतर अर्ध्या तासांनी महापौर सभागृहात आल्या. त्यावेळीही कोणीतीही सूचना न मांडता महापौरांनी सभेचे कामकाज शुक्रवार दि.१० पर्यंत तहकूब केले.
डिसेंबर महिन्याची तहकूब सभा आज होती. महापौर माई ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादन करताना नूकसान भरपाई देण्याची कार्यपद्धतीत व धोरण महापालिकेने २०१३ मध्ये निश्चित केले आहे. त्यात सन २०१५ मध्ये बदल करण्यात आला होता. आता सत्ताधारी भाजपने पुन्हा या धोरणात नव्याने बदल करण्याचे ठरविले आहे. याबाबतचा ठराव स्थायी समितीत २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पारित करण्यात आला आहे. या ठरावावरुन भाजप नगरसेवकांमध्ये दुफळी आहे. या ठरावावरुन महासभा वारंवार लांबणीवर टाकली जात आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा झाली.
विषयपत्रिकेवर पहिल्याच क्रमांकाला हा विषय होता. भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये हा प्रस्ताव तहकूब करण्याचे ठरले होते. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी तसा व्हीप देखील नगरसेवकांना बजाविला होता. भाजप नगरसेवक सागर अंगोळकर यांनी खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादनाचा विषय वाचला. त्याला अंबरनाथ कांबळे यांनी अनुमोदन देताच महापौर ढोरे यांनी तहकूब केल्याचे सांगितले. या तहकुबीला आक्षेप घेत भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. दरम्यान राहुल कलाटे यांनी मानदंड उचलत भाजपाच्या हुकूमशाही पध्दतीचा निषेध नोंदविला. त्यानंतर कोणतीही सूचना आणि अनुमोदन न देताच महापौरांनी महासभा तहकूब असे जाहीर केले अन् त्या आसनावरुन उठून गेल्या.
यासर्व गोंधळात महापौर तसेच सत्ताधारी भाजपाला राष्ट्रगीताचा देखील विसर पडला. राष्ट्रगीत न होताच महापौर सभागृहातून त्यांच्या दालनात निघून गेल्या. महापौर आणि सत्ताधारी नगरसेवकांना याची जाणिव झाल्यानंतर अर्ध्यातासांनी महापौर सभागृहात आल्या. त्यांनी आजची महासभा शुक्रवार (दि.१०) दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले. आणि त्यानंतर राष्ट्रगीत झाले. सत्ताधारी भाजपाकडून सभाशास्त्रांची अशाप्रकारे झालेली पायमल्ली याचा विरोधकांनी तीव्र निषेध नोंदविला.