एकूण २० क्रीडा प्रकारात पालिका व खासगी शाळेचे तब्बल२० हजार विद्यार्थी- खेळाडूंचा सहभाग; उपमहापौर तुषार हिंगे यांची माहिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर चषक पिंपरी चिंचवड शहर शालेय स्पर्धेस (टेन 20) विविध २० क्रीडा प्रकारात महापालिका व खासगी शाळांचे तब्बल २० हजार विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेला रविवारी (दि.१२) इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल येथे शानदार सुरूवात होणार आहे, अशी माहिती क्रीडा समिती सभापती तथा उपमहापौर तुषार हिंगे यांनी गुरूवारी (दि.९) दिली. मोरवाडी, पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहायक आयुक्त संदीप खोत, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे व क्रीडा पर्यवेक्षक उपस्थित होते.
उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहे. या प्रकारे शालेय स्पर्धा घेणारी पिंपरी-चिंचवड ही पहिलीच महापालिका आहे. स्पर्धेचे शानदार उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, खासदार अमर साबळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित राहणार आहे. अंतिम लढती व बक्षीस वितरण म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे रविवारी (दि.२) होणार आहे.
स्पर्धेदरम्यान, सर्व खेळाडूंना पोषक अल्पोहार देण्यात येणार आहे. विजेता व उपविजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पदक व प्रमाणपत्र बक्षीस आहे. स्पर्धा आयोजनासाठी पालिकेचे ३ व क्रीडा संघटनेचे ७ असे एकूण १० सदस्यांची संयोजन समिती स्थापन केली आहे. पालिका शाळेतील खेळाडूंना खेळाचे गेली ३ महिन्यांपासून विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी क्रीडा शिक्षक नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे पालिकेचे विद्यार्थी अधिकाधिक यश प्राप्त करतील, असा विश्वास हिंगे यांनी व्यक्त केला. तसेच, ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाणार असल्याचा दावा केला. सहायक आयुक्त खोत यांनी स्पर्धा संयोजनाबाबत माहिती दिली. स्पर्धेसाठी एकूण ७० लाखांचा खर्च केला जाणार आहे. पत्रकार परिषदेत स्पर्धेच्या नियमावली व वेळापत्रक आणि माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
एकूण २० क्रीडा प्रकार
”स्पर्धेत १२, १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली असे एकूण 6 गट आहेत. स्पर्धेत अॅथलेटिक्स, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, बुद्धिबळ, हॅण्डबॉल, तायक्वांदो, हॉकी, थ्रो बॉल, कबड्डी, जलतरण, कुस्ती, किक बॉक्सिंग, खो-खो, मुष्टियुद्ध, योगासन, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, कराटे, स्केटींग हे २० क्रीडा प्रकार आहेत. तर, शास्त्रीय नृत्य, वादय वादन, सुगम संगीत, समुहगीत, एकांकिका आणि लोकनृत्य असे 6 प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धा आहेत.