पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपा शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या एक दोन महिन्यापासून चांगलीच होती. अनेक दिग्गजांची नावे स्पर्धेत होती. मात्र अखेर भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे. उद्या गुरुवार दि.१६ रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये महेश लांडगे यांच्या अध्यक्षपदाची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदाचा लक्ष्मण जगताप यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपुष्टात आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे नव्या अध्यक्षांची निवड पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यानच्या काळात अध्यक्षपदासाठी भाजपातील अनेकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली होती. त्यात ज्येष्ठनेत्या उमा खापरे, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, राजू दुर्गे, अमोल थोरात यांच्या नावाची चर्चा होती. मात्र राज्यातील झालेला सत्ताबदल आणि पुढच्या काळात येत असलेली महापालिका निवडणूक लक्षात घेता एक ‘तगडे’ नेतृत्व पक्षाला हवे होते. त्याच अनुषंगाने महेश लांडगे यांच्या खांद्यावर शहराध्यक्षपदीची धुरा सोपविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. त्यानुसार उद्या आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये महेश लांडगे यांची नव्या शहराध्यक्षपदाची घोषणा होणार आहे.






















Join Our Whatsapp Group