पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडी येथील पाणी पुरवठा हा गेल्या आठ दिवसापासून विस्कळीत आहे. त्यावर संबंधित पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारी करुनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भाजपा नगरसेविका आशा शेंडगे यांच्या नेतृत्वात कासारवाडी परिसरातील संतप्त महिलांनी आज पाणीपुरवठा कार्यालयात अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. पिण्यासाठी पाणी नसल्याने महिलांनी यावेळी संताप व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यापासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. तरीही शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा उच्च दाबाने व सुरळीत होत नाही. मात्र, पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी शहरभर पाणी पुरवठा सुरळीत आणि उच्च दाबाने सुरु असल्याचे सांगत आहे. कारण, पाणी पुरवठा विभागाच्या तक्रारीचे प्रमाण कमी झाल्याने त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.शहरातील कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी भागातही पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसापासून विस्कळीत सुरु आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, कनिष्ठ अभियंता किरण अंदुरे, शशिकांत दवंडे या अधिकाऱ्यांना चार तास पाणीपुरवठा कार्यालयाच्या खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. दिवसाआड पाणीपुरवठा होऊनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही झालाच नाही, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठीही पाणी नसल्याने नागरिकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर तक्रारी मांडल्या.






















Join Our Whatsapp Group