पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी रावेत येथील बंधा-यातून पाणी उचलले जाते. परंतु या रावेत जलशुध्दीकरण प्रकल्पा भोवतालच्या परीसरामध्ये पाण्यामध्ये बेसुमार जलपर्णी वाढलेली आहे. त्यामुळे तेथील पाणी अशुध्द व दुर्गंधीयुक्त झालेले आहे. या जलपर्णीमुळे संपूर्ण शहराचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुठा नदीत जलपर्णींचा विळखा पडला आहे. तरी तातडीने ही जलपर्णी काढण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
मयूर कलाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मधून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुठा नदींच्या पात्रांमध्ये जलपर्णी पसरलेली आहे. नदीचे पात्र सुध्दा ओळखू येत नाही अशी परीस्थिती झालेली आहे. जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. परंतु ठेकेदार जुजबी काम करुन जलपर्णी न काढता पावसाळ्याची वाट पाहतो. पूरांच्या पाण्यामुळे जलपर्णी वाहून जाते. व ठेकेदार काम न करता निविदेचे पैसे मनपाकडून घेतात त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होते. परंतु शहरातील नागरीकांना या जलपर्णीमुळे खूप त्रास होतो. जलपर्णीमुळे डांस, मच्छरची पैदास होते त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच साथीच्या रोगांचा फैलाव होत आहे. तरी रावेत जलशुध्दीकरण प्रकल्पाभोवतालच्या परीसरातील तसेच शहरातून वाहणा-या नद्यांमधील जलपर्णी तातडीने काढण्यात यावी अशी मागणी मयूर कलाटे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group