पिंपरी (Pclive7com):- मावळ लोकसभा मतदारसंघात विविध पर्यटन क्षेत्रे आहेत. या पर्यटनाला चालना देणे आवश्यक आहे. कार्ला, भाजे लेणी या प्राचीन गुहा, राजमाची, लोहगड, विसापूर, तिकोणा या किल्यांच्या संवर्धनासाठी आर्थिक सहाय्य करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने रायगड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मदत करावी. किल्ला पाहण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक येतील. सर्व राज्यातील पर्यटन स्थळाची माहिती असलेली केंद्रीय पर्यटन पुस्तिका काढावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
लोकसभेत 2020-2021 या वर्षासाठीच्या पर्यटन क्षेत्राच्या नियंत्रणाधीन अनुदानच्या मागणी व मतदान या विषयावर खासदार बारणे बोलत होते. खासदार बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात मोठी पर्यटन क्षेत्रे आहेत. लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. माथेरानमध्ये मिनी ट्रेन चालते. या ठिकाणी लाखोने पर्यटक येत असतात. याठिकाणी पाणी, रस्त्यांची सुविधा नाही. रोपवेची सुविधा केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. कार्ला, भाजे या प्राचीन गुहा आहेत. मुंबईच्या जवळ घारापुरी येथे एलिफंटा गुहा आहे. याठिकाणी रस्ते करण्यासाठी आर्थिक मदत करावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चार किल्ले मावळ लोकसभा मतदारसंघात आहेत. राजमाची, लोहगड, विसापूर, तिकोणा या किल्लांवर जाण्यासाठी सुधारणा केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल. महाराष्ट्र सरकारने रागयड किल्ल्यांची सुधारणा करण्यासाठी प्राधिकरण बनविले आहे. त्याला केंद्र सरकारने मदत केल्यास देशभरातून रायगड किल्ला पाहण्यासाठी देश,विदेशातून पर्यटक येतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगात जाईल. शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळांची माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकाने एक पुस्तक काढले पाहिजे. प्रत्येक राज्यातील पर्यटनाची त्यामध्ये माहिती असावी. सगळ्या राज्यातील भाषेत पुस्तक असावे.
कार्ला गुहा येथे एकविरा देवीचे पुरातन मंदिर आहे. हे खुप जुने मंदिर आहे. लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या पाय-यांची दुरावस्था झाली आहे. त्याची डागडुजी करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. त्यामुळे भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. मावळातील समुद्रा किनारा देखील सुधारण्याची आवश्यकता आहे, असेही बारणे म्हणाले.