पिंपरी (Pclive7.com):- देशासह राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट ओढावले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१८ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, माँलस्, सर्व्हिस सेंटर, गर्दी होणारे व्यावसायिक यांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीदेखील पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी या आदेशाची गांभीर्याने दखल घेण्यात आल्याची दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून चिखली परिसरात दुकाने चालू ठेवणाऱ्या तब्बल १६ दुकानदारांवर पोलीसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने गर्दी टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चिखली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरासह राज्यावर सध्या कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले आहे. म्हणूनच या संकटाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दी टाळण्यासाठी शहरातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. त्या आदेशानुसार चिखली पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील दुकानदारांना व्हाट्सअपद्वारे, स्पीकरवरून तसेच सार्वजनिक ठिकाणी दिसेल अशा ठिकाणी दर्शनी भागावर सदरचा आदेश लावत त्याची प्रसिद्धी केली होती. त्यानंतर देखील या आदेशाची पायमल्ली करत चिखली परिसरातील काही दुकानदारांनी आपली दुकाने चालू ठेवली होती. यात हॉटेल्स, ऑटोमोबाईल्स, सर्व्हिस सेंटर, टी-स्टॉल, वडापाव विक्रेते आदींची दुकाने सर्रासपणे चालू होती. म्हणूनच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या या १६ दुकान चालकांवर तसेच मालकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे देखील सुद्धा दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर अशी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group