पिंपरी (Pclive7.com):- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना पिंपरी चिंचवडकरांना दिलासा देणारी एक बातमी आली आहे. सुरूवातीला सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या ८ दिवसात कोरोनाचा एकही ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळलेला नाही. प्रशासकीय यंत्रणेची मेहनत तसेच नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे हा ‘रिझल्ट’ समोर आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान परदेशातून शहरात आलेल्या १३९४ जणांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, आज अखेर शहरातील ५ लाख २२ हजार ७५३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले असून आज आणखी पाच जणांचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, आज संशयित १८ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत २०१ व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावांचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज अखेर १७७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, १२ रुग्णांपैकी शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले आहे.
उर्वरित ९ रुग्णांपैकी ५ रुग्णांचे १४ दिवसानंतरचे घशातील द्रावाचे निगेटिव्ह आले आहेत. त्यानंतर आज (शनिवारी) २४ तासानंतरचा दुसरा नमुना तपासणीकरीता पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.
तसेच आज १८ व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावाचे नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या २४४ कर्मचा-यांच्या टीमने शहरातील ५ लाख २२ हजार ७५३ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.