पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अग्निशामक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. अग्निशामक विभागाच्या वाहनांव्दारे संपूर्ण शहरामध्ये ‘बॅक्टोडेक्स’ औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. ७ अग्निशामक वाहनांव्दारे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेमध्ये पुढील ४ दिवस संपूर्ण शहरामध्ये ही औषधाची फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला असून त्याकरिता उपाययोजना म्हणून आरोग्य विभागामार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानुसार कोरोना बाधित व संशयित रुग्ण आढळलेल्या इमारतीमध्ये व त्या नजीकच्या परिसरात तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांच्या इमारतीमध्ये व आसपासच्या परिसरात ‘सोडियम हायपोक्लोराइड’ व ‘बॅक्टोडेक्स’ची फवारणी करण्यात येत आहे.
तथापि, शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, खाजगी संघटना तसेच अन्य घटकांमार्फत त्यांच्या भागांमध्ये व संपूर्ण शहरांमध्ये औषध फवारणीची वारंवार मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार आरोग्य विभाग व अग्निशामक विभाग यांच्यामार्फत संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे. अग्निशामक विभागाच्या वाहनांव्दारे संपूर्ण शहरामध्ये ‘बॅक्टोडेक्स’ औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. ७ अग्निशामक वाहनांव्दारे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेमध्ये पुढील ४ दिवस संपूर्ण शहरामध्ये ही औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, शहर ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये. तसेच औषध फवारणीच्या कारवाईमध्ये कोणीही अडथळा आणू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.