मुंबई (Pclive7.com):- मुंबई आणि पुणे शहरातील कोरोना बाधितांची परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. त्यामुळे येत्या ४ मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जावू शकतो. परंतू मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३ मेनंतर आणखी १५ दिवस घरात बसावे लागणार आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अशी शक्यता वर्तवली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. परंतू रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तो आटोक्यात येत नाही, असे दिसत आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असे टोपे यांनी सांगितले.
मुंबईतील धारावीसह अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत, ही सध्याची चिंतेची बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. गरज पडली तर ३ मे नंतर फक्त मुंबई आणि पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो, असेही ते म्हणाले.
राज्यात सध्या ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. गेल्या ६ एप्रिलपासून कोंढवा आणि जुन्या पुण्यातील बाजारपेठा बंद आहेत. गेल्या महिन्याभरात मुंबई-पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. याचाच अर्थ असा की पुणे आणि मुंबईतील सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवावा लागेल. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रम, सोहळे-समारंभांवर १८ मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. ३ मेनंतर मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात कमीत कमी १५ दिवस कुठल्याही बिगर महत्त्वाच्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात आतापर्यंत एक लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ९५७ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत, अशी माहितीही टोपे यांनी दिली. राज्यात काही जिल्ह्यात कोरोनाची साखळी मोडण्यात यश आले आहे. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे कोरोना फैलाव मोठ्या प्रमाणात सुरुच असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोनाचे निदान होण्यासाठी आणि कोरोना रोखण्यासाठी कोविड-19 चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.






















Join Our Whatsapp Group