पिंपरी (Pclive7.com):- आजकाल तरूणांमध्ये वाढदिवस मोठ्या पध्दतीने साजरा करण्याचा ट्रेंड सुरू आहे. ज्याचा वाढदिवस असतो त्याला मित्रांकडून भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या जातात. मात्र या प्रथेला फाटा देत पिंपळे गुरव मधील कुणाल जाधव या तरूणाच्या मित्रांनी त्याला वाढदिवसानिमित्त अनोख्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून या तरूणांनी ११ हजार रूपयांचा निधी कोरोना विरोधातील लढ्यास दिला आहे. या निधीचा धनादेश त्यांनी आज (दि.०८) महापौर माई ढोरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
पिंपळे गुरवमधील कुणाल जाधव या तरूणाचा आज वाढदिवस आहे. कोरोनाच्या या संकटात त्याने साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं. मात्र कुणालचे जवळचे मित्र हिमांशू जगताप, सुशिल गायकवाड, सतिश पाचरूपे, लवकिक कर्नावट यांनी त्याला वाढदिवसानिमित्त अनोख्या पध्दतीने शुभेच्छा देण्याचं ठरवलं. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक भान राखत कोरोनाच्या या लढाईत मदतीचा हात देण्याचं निश्चित केलं. या मित्रांनी ११ हजार रुपयांची रक्कम कुणाल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारला दिली आहे. महापौर माई ढोरे यांच्याकडे ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. महापौर माई ढोरे यांनी देखील कुणालच्या मित्रांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तसेच आजच्या तरुणांनी असाच आदर्श घेऊन सामाजिक कार्य करत राहिले पाहिजे अशी भावना व्यक्त केली.






















Join Our Whatsapp Group