पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे आज (दि.२०) येरवडा पुणे येथील एका ७१ वर्षीय वृध्दाचा उपचारा दरम्यान वायसीएम रूग्णालयात मृत्यू झाला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५ वर पोहचली आहे. त्यापैकी ६ रूग्ण हे शहरातील नागरिक होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आज सकाळी ११ वाजता दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील येरवडा परिसरातील रहिवासी असलेल्या एका ७१ वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील वायसीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या १५ वर गेली आहे. त्यातील ६ रूग्ण हे शहरातील नागरिक होते.
तसेच आज सकाळी मधुबन सोसायटी जुनी सांगवी येथील एक रूग्ण पूर्णपणे बरा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील २३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ८३ जणांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात वास्तव्यास असलेल्या ११ जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १३३ जण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत.