पिंपरी (Pclive7.com):- कोरोना साथीमुळे महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झालेले आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी फक्त आर्थिक संकटाच्या मुद्यावर कायदेशीररित्या नियोजनबद्ध महापालिकेची सर्वसाधारण सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोना साथीच्या काळात सामाजिक अंतर राखणे महत्वाचे असल्यामुळे सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात भाऊसाहेब भोईर यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र दोन महिन्यांच्या कालावधी पेक्षा जास्त काळ बंद आहे. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू झाल्यामुळे जवळ जवळ सर्व अधिकार पुणे जिल्हा कलेक्टर आणि महानगरपालिका आयुक्तांकडे गेलेले आहेत. प्रशासनाकडून कोरोना साथीसंदर्भात घेतले जाणाऱ्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्यामुळे, आणि शहरातील डॉक्टर, नर्सेस, इतर आरोग्यसेवक, पोलीस प्रशासन यांच्या प्रशंसनीय कार्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात करोना साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात येतानाचे अहोरात्र प्रयत्न करत आहे.
महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी अद्याप झालेली नाही. यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. याचबरोबर गेल्या दोन महिन्यांपासून महानगरपालिका क्षेत्र जवळ जवळ संपूर्णपणे बंद असल्यामुळे, मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण चालू नसल्यामुळे पालिका क्षेत्रातील संपूर्ण जनता आर्थिक विवंचनेत सापडली आहे. नागरिक महानगरपालिकेच्या करसंकलनात सूट मिळावी म्हणून मागणी करत आहेत.
कोरोना साथीमुळे महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झालेले आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी फक्त आर्थिक संकटाच्या मुद्यावर कायदेशीररित्या नियोजनबद्ध महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोना साथीच्या काळात सामाजिक अंतर राखणे महत्वाचे असल्यामुळे सर्वसाधारण सभा विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली जाऊ शकते. त्यात हि तांत्रिक कारणांमुळे काही अडथळे निर्माण होत असल्यास, आपण शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी. यामुळे सध्या लागू असेलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल आणि महानगरपालिकेला येऊ घातलेलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल. त्यामुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय किंवा शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी दिली आहे.























Join Our Whatsapp Group