पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ असेलेल्या आनंदनगर भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. आत्तापर्यंत एकही बाधित रूग्ण नसल्यामुळे ‘ग्रीनझोन’ असलेल्या प्राधिकरणातील रहिवासी भागात हे स्थलांतर केले जात आहे. याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आकुर्डी-प्राधिकरण येथील पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये या नागरिकांना हलविण्यात येत असून नगरसेवक राजू मिसाळ आणि अमित गावडे यांनी याला विरोध केला असून येथील प्रवेशव्दारावर तळ ठोकून बसले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील आनंदनगरचा परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. गेल्या काही दिवसांत ३० हून अधिक जास्त ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण या भागात सापडले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात केली आहे. या भागातील नागरिकांना प्राधिकरण येथील पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये हलवण्यात येत आहे. मात्र याला स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ व व अमित गावडे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बाहेरिल एकाही नागरिकाला आम्ही येथे स्थलांतरित होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
याबाबत बोलताना नगरसेवक राजू मिसाळ व अमित गावडे म्हणाले की, कोरोनाच्या या संकटात आम्ही प्रशासनासोबत आहोत. सुरूवातीपासून आकुर्डी-प्राधिकरण प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना आम्ही करत आहोत. आनंदनगर हा भाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना त्याच प्रभागात दुसरीकडे स्थलांतर महापालिका प्रशासनाने करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या नागरिकांना देखील ते सोयीचे ठरणार आहे. प्राधिकरणाच्या परिसरात आजपर्यंत एकही बाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे हा परिसर ‘ग्रीनझोन’ ठरला आहे. मात्र या परिसरात ‘हॉटस्पॉट’ मधील नागरिकांचे स्थलांतर झाल्यास इथला परिसर देखील धोक्यात येऊ शकतो. सत्ताधारी भाजपाच्या दबावामुळे प्रशासन या महामारीत देखील असे राजकारण करत आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. आम्ही येथे एकाही बाहेरील नागरिकांचे स्थलांतर होऊ देणार नाही. महापालिका प्रशासनाने तेथील नागरिकांची त्याच प्रभागात स्थलांतराची व्यवस्था करावी. प्राधिकरणातील रहिवाशांच्या आरोग्यासाठी आम्ही भागात हे स्थलांतर आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका राजू मिसाळ व अमित गावडे यांनी घेतली आहे.























Join Our Whatsapp Group