पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला ‘रेडझोन’ मधून वगळण्यात आले आहे. ‘लॉकडाऊन’च्या शिथीलतेचा आज पहिलाच दिवस होता. मात्र कोरोनाने पहिल्याच दिवशी शहरात ‘उद्रेक’ दाखवून दिला आहे. दिवसभरात तब्बल २१ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले असून १३ बाधित हे आनंदनगरमध्ये सापडले आहेत. त्यामुळे आजपर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या २७४ वर पोहचली आहे. तर सध्या शहरात ८५ आणि शहराबाहेर २१ ‘अँक्टिव्ह’ रूग्ण आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या covid-19 वॉर रूमकडून उशिरा आलेल्या माहिती नुसार दिवसभरात शहरात तब्बल २१ कोरोनाचे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले आहेत. ‘लॉकडाऊन’ सुरू असताना पिंपरी चिंचवड शहर हे ‘रेडझोन’मधून वगळण्यात आले. त्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. वास्तविक पाहता शहरातील सध्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता ही शिथिलता धोक्याची ठरणार होती. आणि तसेच घडले, आज दिवसभरात तब्बल २१ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. त्यात आनंदनगरमध्ये १३, भोसरीत ०२, चिखली ०१, रहाटणी ०१, काळेवाडी ०१, दापोडी ०१, भाटनगरमध्ये ०२ रूग्णांचा समावेश आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून शहरात सातत्याने कोरोना रुग्णांत वाढ होत होती. दररोज १० हून अधिक रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळल्याचे समोर येत होते. असे असताना देखील प्रशासनाकडून शहराला शिथिलता देत बाजारपेठा, दुकाने खुले करण्याचा घातकी निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम आज कोरोनाबाधितांच्या संख्या स्वरूप पाहायला मिळाला. त्यामुळे शिथिलता जरी मिळाली असली तरी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कोरोनाच्या रूग्णात मात्र दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
























Join Our Whatsapp Group