पिंपरी (Pclive7.com):- रेशनकार्ड नसले तरी लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याशिवाय कुठल्याही कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रेशनकार्ड नसणाऱ्या नागरिकांनाही मोफत धान्यवाटप करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करणाऱ्या नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गोरगरीब नागरिकांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी रेशनकार्डधारकांना सरकारच्या वतीने मोफत तसेच स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र स्वतःचे रेशनकार्डही नसणाऱ्या गरीब मजुरांना हे धान्य मिळत नसल्याने त्यांचे मात्र हाल होत होते. या पार्श्वभूमीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सदर गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून रेशनकार्ड नसणाऱ्या लाखो गरीब मजुरांनादेखील धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली. व या संदर्भात राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.
अखेर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील विनारेशनकार्ड धारकांनाही धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता लवकरच सर्वांना मोफत धान्य मिळणार आहे. दरम्यान, नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या निर्णयासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांचेही आभार व्यक्त केले आहेत. तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात अर्ज उपलब्ध करण्यात आले असून गरजूंनी हे अर्ज घेऊन जाण्याचे आवाहनही नगरसेवक वाघेरे यांनी केले आहे.




















Join Our Whatsapp Group