पिंपरी (Pclive7.com):- शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी होमिओपॅथीतील ‘आर्सेनिक अल्बम- 30’ या गोळ्या उपयुक्त मानल्या जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, ‘आयुष’सह राज्यातील आरोग्य विभागानेही या गोळ्या घेण्याचे सुचविले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यामुळे काही व्यावसायिकांनी त्याच्या किंमतीही प्रचंड वाढविल्या आहेत. त्यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवक तुषार कामठे यांनी स्वखर्चातून पिंपळे निलख- विशालनगर परिसरात या गोळ्या मोफत वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. जवळपास २५ हजार कुटुंबांना पुरतील, एवढ्या गोळ्यांचे वाटप प्रभागात केले जात असून नगरसेवक कामठे हे स्वतः घरोघरी जाऊन नागरिकांनी या गोळ्या दिल्या आहेत. त्याचबरोबर या गोळ्यांचे सेवन कसे करायचे याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. सध्या गोळ्यांचा तुटवडा असल्याने या गोळ्यांचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार असल्याचेही नगरसेवक कामठे यांनी यावेळी सांगितले.
‘आर्सेनिक अल्बम 30’ औषध टाकून दिलेल्या या चार गोळ्या दररोज उपाशी पोटी घ्याव्यात. असे तीन दिवस करावे. गोळ्या घेण्याआधी व नंतर किमान अर्धातास काही पिऊ नये, खाणेही टाळावे. पहिल्या डोसची तारीख नोंद करून पुढील महिन्यात त्याच तारखेला पुन्हा तीन दिवस दुसरा डोस घ्यावा. कोरोनावर औषध म्हणून नव्हे, तर कोरोना व त्यासारखे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढीच्या या गोळ्या असल्याचेही नगरसेवक कामठे यांनी नागरिकांना माहिती देताना सांगितले.
दरम्यान, एकीकडे इतर लोकप्रतिनिधी या गोळ्यांच्या वाटपासाठी महापालिकेवर अवलंबून असताना नगरसेवक तुषार कामठे यांनी कोणत्याही मदतीची वाट न पाहता नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत स्वखर्चातून या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे. त्यामुळे इतर प्रभागातील नगरसेवकांनीही नगरसेवक कामठे यांचा आदर्श घेत आपापल्या प्रभागात गोळ्यांचे मोफत वाटप करावे, अशी अपेक्षा शहरातील नागरिक करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group