पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. लॉकडाऊन 4.0 आज रात्री १२ वाजता संपणार असून उद्यापासून 1 जून पासून लॉकडाऊन 5.0 लागू होणार आहे. तो ३० जून पर्यंत लागू राहणार आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारने शनिवारी दिशानिर्देश जाहीर केले होते. दरम्यान, ठाकरे सरकारनं लॉकडाऊन 5.0 बाबत आज (रविवार) दिशानिर्देश जाहीर केले आहेत. लॉकडाऊन 5.0 मध्ये ३ टप्पे करण्यात आले आहेत. ३ जून, ५ जून आणि ८ जून पासून लॉकडाऊन 5.0 उघडणार आहे. त्यासंदर्भातील नियमावली राज्य सरकारनं जाहीर केली आहे.
चौथ्या लॉकडाउनमध्ये राज्य सरकारने रेड झोन वगळता इतर ठिकाणी अनेक सेवा सुरू करण्याची परवानगी दिली होती. आता रेड झोनमध्ये येणाऱ्या महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पण कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.
■ महाराष्ट्रातील रेड झोन
मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर परिसरातील इतर महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या ही महापालिका क्षेत्रांमध्ये अनेक गोष्टी आता टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
▪मिशन बीगिन अगेनचा दुसरा टप्पा
हा दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार आहे. यामध्ये दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.
१. ५ जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी असेल. मात्र, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स यांना परवानगी नसेल. परंतु यासाठी नियम असेल तो म्हणजे पी1 आणि पी2 असा. म्हणजेच रस्त्याच्या/लेनच्या किंवा पॅसेजच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी सुरू असतील तर दुसऱ्या बाजूची दुकानं दुसऱ्या दिवशी सुरू असतील. परंतु त्यांना केवळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ याच काळात दुकाने सुरू ठेवता येतील.
● कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.
● लोकांनी दुकानांवर किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल. शिवाय, यासाठी वाहनही वापरता येणार नाही.
● एखाद्या मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचा वापर केला जात नसल्याचे आढळल्यास, ते मार्केट तत्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.
२. टॅक्सी, कॅब आणि रिक्षा यांनाही ५ जूनपासून परवानगी असेल. मात्र त्यासाठी १+२ अशा संख्येचे बंधन असेल. म्हणजेच चालक अधिक दोन प्रवासी घेऊन आता टॅक्सी, कॅब आणि रिक्षा सुरू करता येतील. चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असेल. मात्र दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.
▪मिशन बीगिन अगेनचा तिसरा टप्पा
हा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार आहे. त्यात खासगी कार्यालयांना काही अंशी परवानगी देण्यात आली आहे.
१. खासगी कार्यालयांना ८ जूनपासून कामास सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येतील त्यांनी सॅनेटायझेशनची सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे.























Join Our Whatsapp Group